मराठ्यांचे पानिपत का झाले?

Pencil sketches side by side: a figure writes on a hill beside a dented shield at sunrise; a figure plans at a lamp-lit desk

मला खरंच या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण माझं पानिपत का झालं, याचं उत्तर जरी शोधता आलं तरी खूप मिळवलं.

चला सुरुवातीपासून सुरुवात करूया. दिवसाची सकाळ किती वाजता झाली, यावर दिवस कसा जाणार हे बहुतांश अवलंबून असतं. काल रात्री झोपायला बारा झाले. रात्री झोपायला बारा झाले तर दुसऱ्या दिवसाचे बारा वाजतील हे कोणी सांगायला भविष्यवेत्ता नको.

तर धडा क्रमांक एक. मॉर्निंग रुटीन सेट करण्यापेक्षा इव्हनिंग रुटीन सेट करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर दुसऱ्या दिवशीचं मॉर्निंग रुटीन ठरतं. इव्हनिंग रुटीनमध्ये काय काय बरं यायला हवं? दुसरा दिवस आपल्याजवळ कागदावर आधीच तयार असायला हवा. महत्त्वाची कामं कुठली करायची आहेत, कुठे बाहेर जायचंय, कुणाला वेळ दिला, हे सगळं अगोदरच नक्की हवं. सगळ्यात महत्त्वाचं: दुसऱ्या दिवशी आपल्याला काय काय प्राप्त करून घ्यायचंय, त्याची यादी व त्या गोष्टींना निश्चित वेळ दिला गेला पाहिजे. अचानक येणाऱ्या कस्टमरच्या इमर्जन्सीसाठी बफर जागा, बफर वेळ रुटीनमध्ये असायला हवा.

धडा क्रमांक दोन. एखादी गोष्ट अंगवळणी पाडायची असेल तर जेवढं ठरवलं तेवढंच झालं पाहिजे, असा अट्टाहास सुरुवातीला नको. तासभर व्यायाम करायचं ठरवलं. पण 40 मिनिटं व्यायाम झाला. काही हरकत नाही; शून्य व्यायाम तर झाला नाही ना, हेदेखील महत्त्वाचं. आणि सुरुवातीला मोमेंटम येण्यासाठी हे फार महत्त्वाचं.

धडा क्रमांक तीन. आपल्या डोक्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ नक्की असते. ती वेळ निघून गेली की ती गोष्ट करावी की न करावी, असा संभ्रम निश्चितपणे उभा राहतो. आज दिवाळीच्या सुट्टीचा दिवस, त्यामुळे काही गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या तरीदेखील त्या पूर्ण करायच्याच असं ठरवून काम केलं. दरवेळेला हे शक्य असतं असं नाही.

धडा क्रमांक चार. अचरट बचरट सटरफटर असं सगळं खाण्याची सवय लागलेले आम्ही. ताट व्यवस्थित वाढून घ्यावं. याचा अर्थ काय खाणार, किती खाणार, पोटात भूक किती? या सगळ्या संबंधीचा अवेअरनेस अगदी सुरुवातीला आणावा लागतो. अहो, जेवायच्या अगोदर ठरवावं लागतं. हे जरा कठीण. पण आज ते जमलं अगदी सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोन्ही जेवणाच्या अगोदर व्यवस्थित ताट वाढून घेतलं आणि त्याचा फोटो देखील काढला. जेवण झाल्यानंतर आणखीन थोडंसं काहीतरी (कुछ मीठा हो जाये) अशी तलफ आवर्जून आली होती.

धडा क्रमांक पाच. Don’t underestimate the power of a common man. आज सकाळच्या ध्यानाला अगदी 20च मिनिटं देता आली. पण ही वीस मिनिटे देखील खूप महत्त्वाची होती. माझं Garmin वॉच स्ट्रेस लेव्हल बिफोर मेडिटेशन आणि स्ट्रेस लेव्हल आफ्टर मेडिटेशन दाखवतं. सुरुवातीला स्ट्रेस लेव्हल होती 76; संपत असताना 22. वीस मिनिटात जर एवढा फरक पडत असेल तर पूर्ण तासाभराने किती पडेल, हे फायद्याचं गणित सांगायला कुणाचीच गरज नाही.

धडा क्रमांक सहा. डायबिटीसच्या टेस्ट करून घेतल्या. आणि जी शंका होती ती 100% खरी ठरली. याबद्दल विस्ताराने उद्या बोलू.

दिवस एक संपला.

Review, reorganise, be aware, take action.