आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या ठरवलेल्या असतात पण नेमकी एक तारीख येत नाही किंवा सोमवार येत नाही किंवा जानेवारी महिना येतो आणि कसा निघून जातो तेदेखील कळत नाही.
मग या गोष्टी चालू केव्हा करायच्या?
माझा डायबिटीस चालू होऊन आता चार-एक वर्षं झाली. Covid आणि डायबिटीस एकत्र झाले होते. कोविड जाऊन चिकनगुनिया, झिका, डेंग्यू सगळे येऊन गेलेत. पण आमचा डायबिटीस काय हलायला तयार नाही.
आता तो कसा हलणार? तो स्वतःहून आला नाही, मीच त्याला बोलावलं. एकदा त्याला हरवलं, पळवलं आणि मी गाफील झालो. तर डायबिटीस साहेब परत हजर.
आता मात्र याला हद्दपार करायचं ठरवलं.
कुठली बरं कारणं आहेत, की त्याला माझ्यासोबत राहणं फारच आवडतं?
१. अनियमित दिनचर्या. सॉफ्टवेअर प्रोफेशनल आणि अनियमित दिनचर्या हे काही वेगळं सांगायला नको. वेळेवर झोपायला नको. वेळेवर उठायला नको. वेळी अवेळी जागरण करायला हवं.
२. अनियमित व्यायाम. सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून एक तर बसून काम. समोर आलेलं पोट, दुखत असलेली मान आणि पाठ हे सगळे सोबत आहेतच. व्यायाम हा काही नियमित आयुष्याचा भाग नाही. त्रास झाला की थोडीशी फिजिओथेरपी करायची. त्रास झाला की पंधरा दिवस नियमितपणे चालायला जायचं. असं काहीसं आपलं रुटीन आहे. डायबिटीस साहेब मात्र नियमित व्यायामाला घाबरतात हे नक्की.
३. कुछ मीठा हो जाये – मला गोड खायला आवडतं असं अभिमानाने सांगत, मिरवत, प्रत्येक जेवणात न विसरता काहीतरी गोड खाणारे आणि कधी कधी नुसतं गोडाचेच जेवण करणारे आम्ही. फुकटात मिळतं म्हणून खाणारे की भूक लागली म्हणून खाणारे असा झोंबणारा प्रश्न कधीतरी आपण विचारलाच पाहिजे. डायबिटीस मात्र असा प्रश्न विचारत नाही. तो शांतपणे रक्तात आपले पाय रोवून उभा राहतो.
४. ताण-तणावांचं नियोजन नसणे. आयुष्य म्हटलं की ताण-तणाव असणारच, स्ट्रेस, टेन्शन की हो. पण त्यांना योग्य प्रकारे हाताळलं नाही की ते अनेक ठिकाणी आपला इफेक्ट सोडून जातात. हे ताणतणाव आयुष्यात व्यवसायामुळे, नोकरीमुळे, कधी कधी आपल्या स्वभावामुळे, कुटुंबातील शांतता, अशांतता, संवाद, असंवाद आणि आपल्या स्वभावातील रागीटपणा या सगळ्यांचा परिपाक असतात.
प्रश्न सोडवायचा असेल तर कृती करायला लागेल. ॲक्शनशिवाय पर्याय नाही. विलनला हरवायचं असेल तर ॲक्शनच करायला लागते. आयुष्याचा नवीन पिक्चर तयार करायचा असेल तर ॲक्शनच करायला लागेल. ॲक्शन आतापर्यंत आपण करतच होतो पण त्यात कुठेतरी नियमितपणा नव्हता. कन्सिस्टन्सी नसणे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे, डायबिटीस साहेबांना आमच्यासोबत राहायला आवडतं याचं.
काय बरं करू?
१. वेळेवर झोपणे वेळेवर उठणे.
२. सकाळ संध्याकाळ एक एक तास व्यायामाला देणे.
३. जेवणातून गोड पदार्थांची सुट्टी करून हिरव्या पालेभाज्या, कडधान्यं यांच्यावर भर देणे.
४. दिवसातून दोनदाच जेवणे.
५. आणि दिवसातून दोनदा ध्यान करून स्वतःच्या ताण-तणावांचं योग्य नियोजन करणे.
ॲक्शन ठरली. पण याचं मॉनिटरिंग कसं करायचं? याच्यावर लक्ष ठेवणार कोण? आपणच ठरवायचं आणि आपणच बंद करायचं असं नेहमीच होतं.
कुठलीही सवय अंगी बाणवायची असेल तर फेल प्रूफ सिस्टम लावावी लागेल. प्लान ए, बी, सी, डी, ई आणि गरज असेल तर झेड पर्यंत जायची तयारी ठेवायला लागेल.
यावेळेला मॉनिटरिंग सिस्टम खालीलप्रमाणे वापरूया:
१. सवयींचे गुणपत्रक म्हणजेच हॅबिट स्कोअर कार्ड
२. अकाउंटेबिलिटी पर्सन – घरातील छोटी मुलं सगळ्यात चांगले अकाउंटेबिलिटी पर्सन असतात.
३. सोशल अकाउंटेबिलिटी – हे जरा रिस्की आहे. सगळ्या जगाला ओरडून सांगितलं आणि केलं नाही तर…
४. आणि सगळ्यात महत्त्वाचं डेली प्रोग्रेस मेजरमेंट बाय नंबर. म्हणजे आकड्यांसोबत राहायचं, जे खोटं बोलत नाहीत.
चला घेऊन बघतो 100 दिवसांचं डायबिटीस चॅलेंज.
आजचा डे झिरो. तयारीचा दिवस. तयारी झाली:
- मल्टिपल अलार्म सेट केले
- व्यायामाचे कपडे, जोडे, वॉटर बॉटल सगळं तयार आहे
- स्प्राऊट्स भिजायला घातलेत. जेवताना टोमॅटो, काकडी उपलब्ध होईल यासाठी फ्रीजमध्ये डोकावून बघितलं.
- Smoothieसाठी पालक, पुदिना, फळं आहेत
- ड्रायफ्रूट्सची तयारी झालेली आहे
- हॅबिट स्कोअर कार्डचा प्रिंट आऊट बोर्डवर लावलाय
- ध्यान करण्यासाठी जागा, कुशन यांची तयारी करून ठेवली
- जेवण 45 मिनिटांत होईल, आणि प्रत्येक जेवणाचा फोटो टाकायचा आहे.
- व्यायाम व ध्यान केल्यानंतर Garmin वॉचचा स्क्रीनशॉटदेखील टाकायचा आहे.
- वजनाचा काटा तयार आहे
आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही होईल, जसं काही होईल, ते सगळं, खरं खरं, स्पष्टपणे, न घाबरता, न भिता, लिहायचं आहे. रोजच्या रोज पब्लिश करायचं आहे.
ऑल दि बेस्ट.
Awareness to wisdom, wisdom to action and action to change. Let’s begin.


